अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे उदघाटन सोहळा १ नोव्हेंबर २०२० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख,पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दरम्यान, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे आमदार असतांना मार्च २०१० मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यासाठी ५५६.३९ लाख खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तर १४ मे २०२० अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वास आले होते.
या वसाहतीत ५ इमारती असून ४१ घरे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. सदर बांधकाम पूर्णत्वास येऊन देखील रहिवासाला परवानगी देण्यास टाळाटाळ होत होती, म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पोलीस अधीक्षक जळगाव व बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला होता. प्रशासन मात्र हातावर हात धरून शांत असतांना माजी आमदारांनी १५ ऑगस्ट तसेच २ ऑक्टोबर २०२० रोजी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली करायला सुरुवात केली. शेवटी आता १ नोव्हेंबर २०२० रोजी उदघाटन पार पडल्यानंतर, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा इमारतीतील रहिवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या काळात मान्यता मिळालेल्या कामाचं उदघाटन त्यांच्या धर्मपत्नी शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या कार्यकाळात होत आहे हे देखील विशेष आहे.















