भडगाव (प्रतिनिधी) येथील माऊली फाऊंडेशन यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणुन माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने सँनिटरी पँड निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. सदर प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येणार आहे. अशी माहिती माऊली फाऊंडेशनच्या स्वयंसेविका संगिता जाधव यांनी दिली.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन अमळनेर येथील समाजसेविका, व्याख्यात्या तथा लेखिका दर्शना पवार उपस्थित होत्या. प्रकल्पाचे उदघाटन आई गुंताई सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी हे होते. कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना दर्शना पवार यांनी सांगितले की, मासिक पाळी ही स्रीला देवाने दिलेली नैसर्गिक देणगी असुन मासिक पाळीमुळेच स्रीला मातृत्व प्राप्त होते. असे असले तरीही समाजाचा स्रियांच्या मासिक पाळी विषयी बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. आजही समाजात मासिक पाळीविषयी म्हणावी तेवढी जनजागृती होतांना दिसत नाही. मासिक पाळी कालावधीत स्रियांनी काळजी घेणे गरजेचे आहे.यासाठी सँनिटरी पँडचा वापर करणे गरजेचे आहे.मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेबाबत काळजी घेतली नाही तर स्रियांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यांत गर्भाशयाचा कँन्सर होऊ शकतो. ग्रामीण भागात आजही कपड्याचा वापर केला जातो. म्हणुन मासिक पाळी विषयी ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे. असे सांगुन दर्शना पवार यांनी माऊली फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
सदर प्रकल्प माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर सुर्यवंशी यांची कन्या अदिती सुर्यवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सदर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. सदरप्रसंगी कार्यक्रमास आलेल्या महिला व मुलींना 1 हजार सँनिटरी पँड मोफत भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संगिता जाधव यांनी केले. सुत्रसंचलन मीरा जाधव व आभार प्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी माऊली फाऊंडेशनचे सर्व पुरुष व महिला स्वयंसेवक उपस्थित होते.