मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्यावर एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्ह दाखल झाला आहे. श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमबीर सिंह यांच्यासहित काही जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याची आरोप परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलिसांवर आहे.
कुणाकुणाची नावं?
श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रबंधक विभागाने (एसीबी) पोलिस निरिक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृह विभागाकडे मागितली होती. त्यानुसार गृहविभागाने परमबीर सिंह यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. डांगे यांच्या तक्रारीनुसार २३ नोव्हेंबर २०१९ ला गावदेवी येथील डर्टीबन्स पब रात्री उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, याचे दोन मित्र व तीन विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेले पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली व यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणात जीतू नवलानीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंह यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते, असा आरोप डांगे यांच्या लेखी तक्रारीत केला होता.
परमबीर सिंह आणि अनिल देशमुख प्रकरण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.