सिडनी (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस असून भारताचा पहिला डाव १००.४ षटकात २४४ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघ ९४ धावांनी पिछाडीवर पडला आहे.
चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. रविंद्र जाडेजानं अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद २८ धावांची खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ९४ धावांची आघाडी आहे. भरातीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघानं वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफलातून क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं. कांगारुंनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केलं. यामध्ये हनुमा विहारी(४), आर. अश्विन (१०)आणि जसप्रीत बुमराह (००) यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक चार बळी घेतले आहेत. तर हेजलवूडनं दोन भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. तर स्टार्कला एक विकेट मिळाली.
तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर कमिन्सच्या सुरेख चेंडूवर अजिंक्य रहाणे क्लीन बोल्ड झाला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. पंत-पुजारा यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्या चेंडूवर हेजलवूडनं पंतला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर पुजाराही लगेच बाद झाला. त्यामुळे एकवेळ चांगल्या स्थितीत असणाऱ्या भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ऑस्ट्रेलियानं सामन्यावर पकड मिळवली.
तळातील फलंदाजी गडगडली
पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारताची तळातील फलंदाची गडगडली. पुजारा बाद झाल्यानंतर आर अश्विन ९३ व्या षटकात धावबाद झाला. त्याला पॅट कमिन्स आणि मार्नस लॅब्यूशानेने मिळून धावबाद केले. अश्विनने १० धावा केल्या. तर पदार्पण करणारा नवदीप सैनी ४ धावांवर असताना ९५ व्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मॅथ्यू वेडकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच ९७ व्या षटकात लॅब्यूशानेने जसप्रीत बुमराहला धावबाद केले. अखेर मोहम्मज सिराजची विकेट कमिन्सच्या गोलंदाजीवर गेल्याने भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. सिराज ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा २८ धावांवर नाबाद राहिला.