संगमनेर (वृत्तसंस्था) प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकीलपत्र मागे घेतल्याने नवीन सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली असून कोर्ट रजेवर असल्याने या खटल्याची सुनावणी आता 2 डिसेंबरला होणार आहे.
कीर्तनातून पीसीपीएनडीफ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. तेथे देण्यात आलेल्या प्रोसेस इश्यूच्या आदेशाला इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून त्यावर पुढील सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर इंदुरीकरांतर्फे के. डी. धुमाळ तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रंजना गवांदे बाजू मांडत आहेत. खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकीलपत्र मागे घेतल्याने नवीन सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली आहे.