जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सर्वच भागांमध्ये सर्रासपणे अवैध धंदे सुरु आहेत. यातच पिंप्राळा हुडको परिसरात असलेल्या पोलीस चौकीसह महापालिकेची आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद प्राथमिक शाळेच्या परिसरात हाभट्टीची दारु विक्री केली जाते. तसेच सट्टा व जुगाराचे देखील याठिकाणी अड्डे सुरु असल्याने संपुर्ण परिसरात अवैध धंद्याचा विखळ्यात अडकले आहेत. त्यामुळे याठिकावरील अवैध धंदे चालकांवर कारवाईची मागणीसाठी परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत अवैध धंदे बंद करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शहरातील पिंप्राळा परिसरातील हुडको आणि ख्वॉजानगरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे सर्रासपणे सुरु आहेत. यामुळे तरुणांसह परिसरातील लहान मुले व्यसनाच्या आहारी जावून त्यांचे जीवन उद्धवस्थ होत आहे. याठिकाणी असलेल्या पोलीस चौकीसह महपालिकेच्या उर्दू हायस्कूल व मौलाना अब्दुल कलाम आझाद प्राथमिक शाळेच्या परिसरातील रस्त्यावर सर्रासपणे गावठी हातभट्टीची दारु विक्री केली जाते. त्याच ठिकाणी सट्टा, पत्ता देखील खेळला जातो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच परिसरातून जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे त्यांना या सर्वांचा त्रास करीत शाळेत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर देखील त्याचा परिणाम होवू लागला आहे.
तसेच भर रस्त्यात असलेल्या दारुच्या अड्डूयांवर दारु पिवून दारुचे मोठमोठ्याने शिवीगाळ करीत धिंगाणा घालीत असल्याने त्याचा त्रास परिसरात नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी मांडल्या. हातभट्टीची दारु पिवून दारुडे परिसरात शिवीगाळ करीत धिंगाणा घालीत असल्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह महिलांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहेत. त्यामुळे याठिकाणावरील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद व्हावे अशी मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाद्वारे पोलिस प्रशासनाला करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, मुक्ती हरुन, माजी नगरसेविका हसीनाबी शरिफ शेख, सुरेश सोनवणे, समाजसेवक अतुल बारी, आसिफ शेख, एमआयएमचे अक्रम देशमुख, विनोद निकम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कारवाईनंतर पुन्हा अवैध धंद्याला जोमाने सुरुवात !
परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपुर्वी याठिकाणावरील अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज केले होते. यावेळी त्यांच्यावर कारवाई झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा याठिकाणी अवैध धंद्यांना सुरुवात केली असून ते पोलिसांना देखील जुमानत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
रात्रीच्या वेळेस दारुड्यांची भरते शाळा !
पिंप्राळा हुडको परिसरात असलेल्या शाळेच्या आवारात दिवसासह रात्रीच्या वेळेस दारुडे दारु पिण्यासाठी येतात. तसेच ते याचठिकाणी दारुच्या बाटल्या फोडून घाण करतात. शाळेत येण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा शाळेकडून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. मात्र त्यांच्या कडून कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.