जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पोलीस पथकाकडून फाईल तपासणी सुरू होती. पोलीस पथक दूध संघात ठाण मांडून असून, या वर्षाच्या फाईल्ससह मागील पाच वर्षांदरम्यानच्याही कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आजपासून कागदपत्र पडताळणी सुरुवात होणार आहे.
दूध संघातील लाेणी अपहारप्रकरणी तपासी अधिकारी डीवायएसपी कुमार चिंथा यांच्यासह शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, एपीआय संदीप परदेशी यांच्यासह टीमने शुक्रवारी जिल्हा दूध संघातील प्रशासकीय कार्यालयात जाऊन सात तास तपासणी करत सर्व संबंधित विभागातील शेकडाे फाइली ताब्यात घेऊन जप्त केल्या. त्याला व्यवस्थापकीय संचालक मनाेज लिमये यांनी विराेध दर्शवला हाेता. अखेर जप्त केलेल्या प्रत्येक कागदाची झेरॉक्स प्रत दूध संघाला देण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी प्रत्येक कागदाची झेरॉक्स करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, रविवारनंतर जप्त केलेल्या सर्व रेकाॅर्डची पडताळणी केली जाऊ शकते. या अनुषंगाने पाेलिसांच्या सध्याच्या हालचाली दिसत असल्याचे जाणवते आहे.
पाेलिसांनी जप्त केलेल्या फाइलींची संख्या शंभरपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे झेरॉक्स करण्यास कालावधी लागणार आहे. संघ व्यवस्थापनाला झेरॉक्स दिल्यानंतरच कागदपत्रांची पडताळणी पाेलिसांना करता येणार आहे. त्यासाठी पाेलिसांनी दूध संघातील एका खाेलीत या जप्त केलेल्या फाइली ठेवल्या असून, त्या खाेलीला सील लावण्यात आले आहे. दरम्यान, हा प्रकार म्हणजे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप दूध संघाचे संचालक तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे.