जळगाव (प्रतिनिधी) जळगावात शिवजयंती निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नागपूरचे ७२ वर्षीय ईश्वर रामटेके सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची छाप सोडत स्पर्धेचा आखाडा गाजवला. ईश्वर रामटेके यांच्या अंगी असलेली जिद्द तरुणांना प्रेरणादायी आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत एका स्पर्धकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे ७२ वर्षीय ईश्वर रामटेके यांनी. वयाच्या उत्तरार्धाच्या टप्प्यातही रामटेके आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बुद्धिबळाचा पट म्हणजेच आखाडा गाजवत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी देशभरात अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही रामटेके यांनी बुद्धिबळ खेळण्याची आवड जोपासली आहे. म्हणूनच ते बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होत असतात. ईश्वर रामटेके हे नागपूर शहरातील इंदुरा भागातील रहिवासी आहेत. ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळत आहेत. ते लहान असताना इंदुरा भागात काही तरुण बुद्धिबळ खेळत असत. त्यांची गंमत पाहत असताना रामटेके हेदेखील बुद्धिबळ खेळायला लागले. बुद्धिबळ खेळताना आपल्या बुद्धीचा कस लागत असल्याने त्यांना बुद्धिबळ खेळाची गोडी लागली. गल्लीत बुद्धिबळ खेळत असताना पुढे ते स्थानिक पातळीवर आयोजित होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यात यश मिळत गेल्याने ते जिल्ह्याबाहेर आयोजित होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. अशा पद्धतीने बुद्धिबळ खेळाविषयीची त्यांची आवड वाढत गेली. रामटेके यांनी अनेक जिल्हास्तरीय स्पर्धा तर गाजवल्या असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये देखील त्यांनी यश संपादन केले आहे.