जळगाव (प्रतिनिधी) जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ठ गावांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फुर्तीने करावेत. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात जलजीवन मिशन समितीची बैठक पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, ग्रामीण पुरवठा विभागाचे गजभिये, निकम यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व विविध विभागांचे विभागपमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, जलजीवन मिशन ही महत्वपूर्ण योजना असून या योजनेत राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्हा समाविष्ठ असल्याने जिल्ह्यासाठी ही महत्वपूर्ण बाब आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यात ६०३ गावांचा ६४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेतून कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होईल यासाठी नियोजन करावे. जिल्ह्यात हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवून जिल्ह्याचा नावलौकीक वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यंत्रणांना केले.
पाणी टंचाई असलेल्या गावाना पाण्याचा पुरवठा करताना पाण्याचे स्त्रोत निश्चित करण्यात यावेत. यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या सुचना लोकप्रतिनिधींनी केल्यात. शाळा व अंगणवाड्याना पाण्याचा पुरवठा प्राधान्याने होईल यासाठी नियोजन करण्याची सुचनाही उपस्थितांनी केली.