मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह देशाचे राजकारण हादरविणारे देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या शपथविधीची अंतर्गत कहाणी समोर आली आहे. शपथविधी सोहळ्यास एक वर्ष उलटून गेले. तथापि, लेखक प्रियम गांधी यांच्या पुस्तकात फडणवीसांचे प्रश्न आणि अजितदादांची उत्तरे जशी आहेत तशीच छापली आहेत. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे केले गेले आहेत.
ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?
राष्ट्रवादीचा एक ज्येष्ठ नेता हा भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शाह, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचा एक बडा नेताही हजर होता. या बैठकीनंतरची ही गोष्ट. राष्ट्रवादीचा बडा नेता फडणवीसांच्या कार्यालयात जातो आणि ‘पवारांनी आपली भूमिका बदलली असल्याचं’ सांगतो. ‘या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील ही शक्यता फार धुसर आहे. पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचं बरंच वय झालंय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचं पर्व आहे,’ असं हा बडा नेता फडणवीसांना सांगतो. ‘पवारांना आपली प्रतिष्ठा जपायची आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व राजकीय मित्राला दिलेला शब्द पाळला तरच पवारसाहेबांची प्रतिष्ठा टिकू शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेल पक्ष उत्सुक आहे.’
दुपार, वर्षा बंगला :
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फोनवर एक त्रोटक निरोप धाडला : ‘दादा, भाजप-राष्ट्रवादीच्या डीलला पवारसाहेबांचा पाठिंबा बहुधा मिळणार नाही असं दिसतंय. सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजतंय. नेमकं काय चाललंय ?’अजित पवारांनी फडणवीसांना उत्तर पाठवलं : ‘तुम्ही म्हणताहात ते खरं आहे. चित भी मेरी पट भी मेरा, असं पवारांचं एकंदर धोरण दिसतंय. त्यांना वाटतंय की, सेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील. अशी संधी कोण बरं सोडेल ?’
कोण आहेत ते आमदार ?’ फडणवीसांचा प्रश्न.
‘सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय तेरा आणखी,’अजित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्याकडच्या आमदारांची यादी वाचून दाखवली. ‘या आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जावं, असं तुम्हांला वाटतं काय ? ते बाहेर सुरक्षित राहतील,’फडणवीस म्हणाले. ‘नाही, नाही. इथेच थांबू या. इतर आमदारांबरोबर राहिले तर कदाचित ते इतरांचं मनपरिवर्तन करू शकतील. ह्यासाठी व्यूहरचना करावी लागेल. मी माझ्या विश्वासू सहकाऱ्यांशी याविषयी बोलतो. चार आमदारांचा एक गट करू. माझ्या विश्वासातले २८ आमदार ग्रुप लीडर म्हणून काम करतील. उरलेल्या एक-एक दोन आमदारांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचं काम या २८ आमदारांवर सोपवलं जाईल,’ अजित पवार म्हणाले.