मुंबई (वृत्तसंस्था) दररोज पन्नास हजार रुपयांची स्वतः उधळपट्टी करणाऱ्या महाराष्ट्रातून बेपत्ता असणाऱ्या या बंडखोर आमदारांच्या व त्यांच्यासाठी खर्च करणाऱ्या प्रायोजकांच्या समाजद्रोही कृत्याची दखल घेऊन त्यांच्या विरुध्द निःपक्ष चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार ईडी (ED) , राज्यपाल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे (Bribery Prevention Department) केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी दिली.
माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलेय की, ज्या मतदारांनी आमदारांना निवडून दिलयं ते आमदार आज पंचतारांकित हॉटेलमध्ये दिवस काढत आहेत. हा पैसा आला कोठून?, हा माझा प्रश्न आहे. या मागे कटकारस्थानी कपटी फडणवीस यांचा हात आहे. भाजपची सत्ता आल्यास लोकशाही धूळीस मिळून जाईल. म्हणून ईडी , राज्यपाल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे आपण तक्रार केली असल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे. शिवाय या या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देतील अशी आपणाला आशा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. अनिल गोटे यांनी आज बडखोर आमदारांवरती खर्च करणाऱ्या प्रायोजकांची चौकशी करुन त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे केली आहे.