जळगाव (प्रतिनिधी) नविन चौपदरी महामार्गावर वृक्षारोपण लागवडीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सक्षमपणे व पारदर्शीपणे वृक्ष लागवडीची मोहीम जोरदारपणे राबवावी, अशीही मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे राष्ट्रीय महामार्गांच्या (NHs) विकास आणि देखभालीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहे. याशिवाय, ते केंद्रीय रस्ते निधी (CRF)/ CRIF आणि आर्थिक महत्त्व आणि आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी (EI&ISC) योजनांतर्गत राज्य रस्त्यांच्या विकासासाठी निधीचे वाटप करते. त्या अंतर्गत खालील कामांची निविदा काढण्यात आलेल्या होत्या व त्यानुसार कामेही पुर्ण झालेली आहेत.
प्रकल्पाचे नांव
१) चिखली ते तरसोद राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ मधील सा.क्र. ३६०.०० ते ४२२.७ लांबीचे चौपदरीकरण (NHAI), लांबी – ६२.७ कि.मी., रक्कम- १४२७ कोटी
२) जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ चे चौपदरीकरण कालीका माता मंदिर सा.क्र. ४२८.०५७ ते खोटे नगर सा.क्र. ४३५.८१ पर्यंत (NHAI), लांबी ७.७५ कि.मी., रक्कम- ६२ कोटी
३) भडगाव ते चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ जे मधील सा.क्र. ५६.२० ते १०३.०० लांबीचे दुहेरीकरण (PWD NH), लांबी – ४६.८ कि.मी., रक्कम- २१० कोटी
४) पहूर जामनेर बोदवड मुक्ताईनगर बानपूर रोड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एल मधील सा.क्र. ०.०० ते ४४.७६ लांबीचे दुहेरीकरण, लांबी ४४.७६ कि.मी., रक्कम- २४५ कोटी
५) पहूर जामनेर बोदवड मुक्ताईनगर बानपूर रोड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एल मधील सा.क्र. ४४.७६ ते ७८.१४५ लांबीचे दुहेरीकरण, लांबी ३३.३८ कि.मी., रक्कम – १७८ कोटी
६) अमळनेर ते चोपडा रोड राज्य महामार्ग १५ मधील सा.क्र. ६० ते ६३ रेल्वे उड्डाणपुल (ROB) ता. अमळनेर जि. जळगाव (CRF PWD), लांबी ३ कि.मी., रक्कम – ३१ कोटी
एकुण १९९ कि.मी २१५३ कोटी
जळगाव जिल्ह्यातील ९ CRF कामे (प्रस्तावित) ६८ कि.मी. ७० कोटी
असे एकूण १९९ कि.मी. रस्त्याचे काम जळगाव जिल्ह्यात झाले असून त्यावर २१५३ कोटी रुपये खर्च झाला आहे. व ६८ कि.मी. करीता रू. ७० कोटी प्रस्तावित आहेत. त्या करीता हजारो झाडाची कत्तल झाली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय द्वारा दि. २८ ऑगस्ट २०१५ ला एक परीपत्रक काढण्यात आले असून त्या नुसार रस्ते बांधणी करीता येणाऱ्या एकूण रकमेच्या १% रक्कम रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाकरीता राखीव करण्यात यावी, म्हणजेच रू. २१५३ कोटीच्या १% रक्कम म्हणजेच २१.५ कोटी रुपयांची तरतूद वृक्षारोपण राखीव आहे, आणि त्या रकमेतुन मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करणे अपेक्षित आहे.
दरम्यान गेल्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ५० कार्यकर्त्यांनी सर्व रस्त्याचा सर्व्हे केला असता २१ हजार रुपयांची झाडं सुद्धा त्या ठिकाणी आढळुन येत नाही. रू. २१.५ कोटी जर खरोखरच खर्च केले असते तर रस्त्यावर दुतर्फा छान सावली निर्माण झाली असती, तसेच पर्यावरणाचा समतोल साधता आला ता. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे वृक्ष लागवड निधी लाटल्याचे स्पष्ट होत आहे.
या कामी सामाजिक संस्था, व्यक्ती, ग्रामपंचायत, व्यवस्थापन यांना सहभागी करून घ्यावे असे स्पष्ट आदेश असतांना सदर काम कोणाला दिले? त्यांनी झाडं लावली का, ती संगोपन व जगविण्यासाठी काय नियोजन केले? सदरहु वृक्षारोपण अंतर्गत निविदा काढली होती काय? तसेच रू. २१ कोटी मधुन किती खर्च झाला व किती निधी शिल्लक आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
महोदय, आपण अतिशय कर्तव्यदक्ष मंत्री आहात. कृपया याबाबत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करून सक्षमपणे व पारदर्शीपणे वृक्ष लागवडीची मोहीम जोरदारपणे राबवावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहोत.