धरणगाव (प्रतिनिधी) शहर आणि परिसरातील बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनामार्फत “भांडी वाटप योजना” राबवली जाते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून ही योजना असून, पात्र बांधकाम कामगारांना स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला ३० वस्तूंमधील भांड्यांचा सेट मोफत देण्यात येतो. मात्र, अलीकडे या योजनेच्या अंमलबजावणीत काही अनियमितता आढळून येत आहेत. काही लाभार्थ्यांना भांडी मिळवण्यासाठी ८०० ते १२०० रुपये देणे भाग पडत आहे. भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदाराकडून ठोस माहिती दिली जात नसून, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी थेट घरी जाऊन वाटप केले जात असल्याचा आरोप होत आहे.
शासनाच्या योजनेचा उद्देश गरजू बांधकाम कामगारांना आधार देण्याचा असताना, या प्रकारामुळे काही लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. भांडी वाटपासाठी कोणतेही अधिकृत कॅम्प शहरात सध्या न लावल्याचे दिसत असून, त्यामुळे लाभार्थ्यांना संभ्रम निर्माण झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक कामगारांमधून होत आहे. लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पारदर्शकपणे पोहचावा यासाठी योग्य ती चौकशी होणे आवश्यक आहे.