अहमदनगर (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, नगरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने यावर आक्षेप घेतला आहे. फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तक्रार केली आहे. तसंच, फडणवीस यांच्याकडे दौरे करण्याआधी परवानगी आहे का, अशी विचारणा राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचा दौरा केला होता. अचानकपणे हा दौरा केल्यामुळे आरटीआ कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. कोरोनाच्या काळात फडणवीस यांच्याकडे जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमाप्रमाणे अर्ज केला आहे, अशी विचारणा माहितीच्या अधिकारातून मुख्य सचिवांकडे केली आहे. कोपरगावात भाजपच्या आमदाराने कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी फडणवीस कोपरगावात दाखल झाले होते. त्यामुळे संजय काळे यांनी याबद्दल शंका व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. तसंच जिल्हाबंदीचे आदेश सुद्धा दिले आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी फडणवीस यांच्याकडे ई-पास होता का? १० पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असं असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमांना एवढी गर्दी कशी काय जमा होते? यावर प्रशासन, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही कारवाई केली का, अशीही विचारणा काळे यांनी केली.
संजय काळे यांनी सविस्तर तक्रारही केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या राज्यघटनेनुसार नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. सध्या राज्यभर लॉकडाऊन लागू करण्यात आला असून त्यासाठी विविध नियम करण्यात आलेले आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई- पास आवश्यक करण्यात आला आहे. हे पासही निवडक व अत्यावश्यक कारणासाठीच देण्यात येत आहेत. रविवारी फडणवीस यांनी कोपरगावचा दौरा केला. त्यांच्या कार्यक्रमासाठी पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेथे करोनाचे रुग्ण दाखल आहेत. अशा ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम घेतले तर साथ कशी अटोक्यात येणार. यापूर्वीही आम्ही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. सामान्यांना नियमांची सक्ती करताना राजकारणी मंडळींनाही नियम पाळण्यास भाग पाडले पाहिजे. कोपरगावमधील या कार्यक्रमाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही काळे यांनी केली आहे.