मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय?, ते पाहावे लागेल असं म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.
सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प्रियंका गांधी शिकस्त करतील, पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल!
काँग्रेस पक्षात सध्या काही उलढाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांसाठी त्यातून सकारात्मक संदेश जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांच्या फेऱ्या सोनियांच्या निवासस्थानी वाढल्या आहेत. कमलनाथ हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होतील, अशी वावटळ त्यामुळे उठली आहे. खरे काय ते राहुल गांधींनाच माहीत. पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश अध्यक्षपदी नेमणूक करून पक्ष संघटनेत आता इतर कोणाची दादागिरी चालणार नाही हे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर व नवज्योत यांच्यात बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू होता. सिद्धू हे काँग्रेस सोडतील अशी हवा होती, पण गांधींनी वेळीच हस्तक्षेप केला.
काँग्रेस पक्षाच्या कमजोरीचा फायदा राज्यांतील नेते घेत आहेत. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात काँग्रेस किंवा गांधी कुटुंबाच्याच नावावर हे नेते निवडणुका जिंकतात, सत्तेवर येतात व सत्तेवर येताच हे सर्व ‘माझ्यामुळेच झाले’ अशी डिंग मारतात. या डिंगबाजीस पंजाबात तडा गेला आहे. सोनिया गांधींचा जो आदेश असेल तो मानू, असे कॅ. अमरिंदर यांना जाहीर करावे लागले. राजस्थानात अस्वस्थता आहे. मध्य प्रदेशातील सरकार हातचे गेले आहे.
राहुल गांधी यांची वक्तव्ये कधी कधी जोरदार असतात. अनेकदा त्यांची चमकदार व पल्लेदार संवादफेक चर्चेचा विषय ठरते. राहुल गांधी यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले की, ”डरपोक नेत्यांनी पक्षातून चालते व्हावे. आर.एस.एस.वाल्यांची काँग्रेसला गरज नाही.” गांधी यांनी हा हल्ला ज्योतिरादित्य शिंदे व जितीन प्रसाद यांच्यावर केला आहे. गांधी परिवाराचे निकटवर्तीय असलेले हे दोघे अचानक भाजपवासी झाले.
गांधी यांच्या बोलण्यातून असे दिसते की, हे दोघे काँग्रेस पक्षातले छुपे संघवालेच होते व ते गेले ते बरेच झाले. ज्योतिरादित्य यांच्या आजी विजयाराजे म्हणजे ग्वाल्हेरच्या राजमाता. त्या जनसंघाशी संबंधित होत्या. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीस विरोध करीत त्या सरळ तुरुंगात गेल्या. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता, पण त्यांचे पुत्र महाराजा माधवराव शिंदे व माधवरावांचे पुत्र ज्योतिरादित्य हे कधी संघ परिवाराच्या वाऱ्यालाही उभे राहिल्याची नोंद नाही. उलट कालच्या लोकसभा निवडणुकीत संघपरिवाराने ज्योतिरादित्य यांचा पराभव घडवून आणला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
आता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये गेले व केंद्रीय मंत्रीही झाले. जितीन प्रसाद यांचे पुनर्वसन अद्याप व्हायचे आहे, पण हे दोघेही ‘डरपोक’ तसेच छुपे संघवाले असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी केला आहे. गांधी यांनी हा आरोप केला म्हणजे त्यांच्या हाती त्याबाबत पुरावे असणारच. काँग्रेस पक्षात संघवाले घुसले आहेत असा एकंदरीत गांधी यांचा सूर असल्याचं शिवसेनेनं म्हटले आहे.
स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे योगदान मोठेच आहे. निर्भयपणे काँग्रेसचे पुढारी स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. इंग्रजांशी झुंज दिली. गांधी, नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री असे असंख्य काँग्रेस पुढारी तुरुंगात गेले. अनेक काँग्रेसवाल्यांनी छातीवर गोळ्याही झेलल्या हे सत्य आहेच. असे धाडस स्वातंत्र्य चळवळीत संघ किंवा इतरांनी दाखविल्याचे दिसत नाही. लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांचे धाडस तर विरळाच. सावरकरसारख्यांचा काँग्रेसशी संबंध नव्हता, पण संघ परिवाराशीही नव्हता. भारतीय जनता पक्षाचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्ष हिंमतवाला होता, डरपोक नव्हता. देशभक्तीशी त्यांचे अतूट नाते तेव्हा होतेच, पण तो काँगेस पक्ष आज उरलेला नाही.
ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद हे ‘संघवाले’ तेव्हा मनमोहन मंत्रिमंडळात होते. या दोघांनाही काँग्रेसनेच घडवले व भरपूर दिले. काँग्रेसमध्ये असताना हे दोघेही भाजप आणि संघावर जोरदार हल्ले करीत होते, पण काँग्रेसचे घर फिरल्यावर वासेही फिरले. ‘जी 23’ या काँग्रेसअंतर्गत गटानेही धुसफूस सुरू केली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा ‘जी 23’ म्हणजे धुसफूस गट आज कार्यरत आहे. या धुसफूस गटामागेही संघ परिवारच असावा असे राहुल गांधींचे मत असू शकते. काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचंही शिवसेनेनं म्हटले आहे.