बैरूत (वृत्तसंस्था) इराणच्या नवीन राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर काही तासांनी हमासचा वरिष्ठ नेता इस्माईल हानियेची बुधवारी हत्या करण्यात आली. इराणची राजधानी तेहरानमध्ये हानिये राहत असलेल्या घरावरील हवाई हल्ल्यात ते ठार झाले. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा दावा करत इराण आणि हमासने बदला घेण्याचा इशारा दिल्याने तणाव वाढला आहे. तर इस्रायलने अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे चीन आणि तुर्कीयेनेदेखील हानियेच्या हत्येचा निषेध केल्याने मध्य-पूर्वेतील परिस्थिती चिघळण्याची चिन्हे आहेत.
इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इस्माईल हानिये ठार झाल्याचा दावा इराण आणि हमासने केला आहे. हानिये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या राजकीय ब्यूरोचा प्रमुख होता. हानिये इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त तेहरानमध्ये पोहोचला होता. शपथविधी सोहळ्यानंतर काही तासांनी हानिये राहत असलेल्या घरावर हवाई हल्ले झाले. या हल्ल्यात हानिये व त्याचा अंगरक्षक ठार झाला. हमासने वक्तव्य जारी करत हानियेला शहीद घोषित केले. इराणचे राष्ट्रपती पेजेशकियान आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हानियेच्या हत्येचा निषेध करत बदला घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
आपल्या भूभागावर आमच्या पाहुण्यांची हत्या करण्यात आली. त्याचा बदला घेणे हे आमचे कर्तव्य आहे. इस्रायलने आपल्यासाठी कठोर शिक्षा स्वतःहून निवडली असल्याचा इशारा खामेनी यांनी दिला. तर हानिये यांच्या हत्येचा तपास केला जात असल्याची माहिती इराणचे निमलष्करी दल ‘रिव्होल्यूशनरी गार्ड’ने दिली. वेस्ट बँकमधील पॅलेस्टीनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी देखील हानियेच्या हत्येचा निषेध केला. हानियेने २०१९ पासून गाझा पट्टी सोडून कतारमध्ये राहत होते. गाझात हमासचा सर्वोच्च नेता हा येह्या सिनवार आहे.
सिनवारनेच गतवर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हवाई हल्ला केला होता. हमासच्या या हल्ल्यात इस्रायलमध्ये १२०० जण ठार झाले होते. तर हमासने जवळपास २५० लोकांचे अपहरण केले होते. यानंतर इस्रायलने हमासचा समूळ खात्मा करण्याचा संकल्प व्यक्त करत गाझा पट्टीत व्यापक अभियान उघडले होते. त्यामुळे हानियेच्या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इस्रायलने एप्रिल महिन्यात गाझात केलेल्या हवाई हल्ल्यात हानियेचे तीन मुले आणि चार नातवंड ठार झाले होते. हानियेची हत्या अशा वेळेस झाली आहे, ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हमास आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कोण होते हानिये?
इस्माईल हानिये हमासच्या पॉलिटिकल ब्यूरोचे प्रमुख होते. ते पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या दहाव्या सरकारचे पंतप्रधानदेखील होते. . हानियेचा जन्म पॅलेस्टिनीच्या शरणार्थी छावण्यांमध्ये झाला होता. १९८९ साली इसायलने त्यांना तीन वर्षासाठी अटक करत नंतर निर्वासित केले होते. निर्वासनातून गाझात परतल्यानंतर १९९७ मध्ये त्यांना हमास आंदोलनाचे आध्यात्मिक नेते शेख अहमद यासीनच्या कार्यलयाचे प्रमुख करण्यात आले होते. येथून त्यांचे हमासमधील प्रस्थ वाढत गेले. हमासने १६ फेब्रुवारी २००६ मध्ये हानियेला पॅलेस्टिनी प्राधिकरणचे पंतप्रधान बनवले होते. पण वर्षभरातच पॅलेस्टिनी नॅशनल प्राधिकरणचे प्रमुख महमूद अब्बासने त्यांची या पदावरून हकालपट्टी केली होती. परंतु हनिये यांनी ही हकालपट्टी अमान्य करत पदावर कायम असल्याचा दावा केला होता. २०१७ साली ते हमासच्या पॉलिटिकल ब्यूराचे प्रमुख बनले होते. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने २०१८ मध्ये हानियेला दहशतवादी म्हणून घोषित केले होते.