मुंबई (प्रतिनिधी) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांच्या कारवाईवर शंका घेतली आहे. त्याचबरोबर राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलेच फैलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला पोलीस व्हॅनमधून असताना आरोपीच्या हातात बेड्या का घातल्या नव्हत्या ? अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळ्या झाडल्या, या पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आम्ही याला एन्काऊंटर म्हणूच शकत नाही. एन्काऊंटरची व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे, असे महत्वपूर्ण मत व्यक्त करताना खंडपीठाने पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी अॅड. अमित कटारनवरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी तातडीने सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अमित कटारनवरे यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. पोलिसांची ही कारवाई संशयास्पद आहे, असा दावा करताना या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पुराव्यांमध्ये फेरफार केला जाण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी विनंती केली.
यावेळी राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील अॅड. हितेन वेणेगावकर यांनी सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हे प्रकरण अधिक तपासासाठी राज्य सीआयडीकडे वर्ग केले आहे. अक्षय शिंदेविरुद्ध नोंदवलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा तसेच त्याच्या मृत्यूबद्दल दाखल केलेला दुसरा गुन्हा अशा दोन्ही गुन्ह्यांचा तपास राज्य सीआयडीने सुरू केला आहे, अशी माहिती न्यायालयाला दिली. यावेळी खंडपीठाने राज्य सरकार आणि पोलिसांचा चांगलाच समाचार घेत एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रश्नांचा भडिमार केला. अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमधून नेत असताना पिस्तुल लॉक का केले नव्हते ? पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा कसा केला? आरोपीने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक पोलिसाला लागली, असे तुम्ही सांगता मग बाकीच्या दोन गोळ्या कुठे गेल्या? असे अनेक प्रश्न उपस्थित करताना सरकारी वकिलांना धारेवर धरले. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करा. तसेच पिस्तुलवर आरोपीच्या हाताच्या खुणा आहेत का? त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे आदेश सरकारी पक्षाला देत याचिकेची सुनावणी ३ ऑक्टोबरला निश्चित केली.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. आरोपी हा इतका ताकदवान नव्हता. त्याने एकदा झटका दिल्यानंतर चौघे पोलीस त्याला पकडू शकले असते. जर त्याने पळण्याचा प्रयत्न केला होता, तर पोलीस प्रथम त्याच्या हातापायावर गोळ्या झाडू शकले असते. असे असताना पोलिसांनी त्याच्या डोक्यावर गोळ्या का झाडल्या? याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत, मग पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का केले नाही? पोलीस व्हॅनमधील चौघे पोलीस अधिकारी एका आरोपीला कसे पकडू शकले नाहीत ? पोलिसांनी सादर केलेला सर्वच घटनाक्रम हा संशयास्पद आहे. याच पार्श्वभूमीवर आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती तपासायची आहे. त्यामुळे पोलीस व्हॅन चालवत असलेल्या चालकासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मुख्य सरकारी वकिलांना देत याचिकेची सुनावणी गुरुवार, ३ ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.
कोर्टात सुरू असलेल्या अक्षय शिंदे युक्तिवाद प्रकरणात मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर खंडपीठाला सर्व घटनाक्रम दिला आहे. त्यावर कोर्टाने तळोजा तुरुंगातून आरोपी अक्षय याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून चकमकीच्या घटनास्थळापर्यंत आणि तिथून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यापर्यंतच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तसेच सीडीआर काढण्याचीही सूचना देताना अक्षय शिंदेला नेताना पोलीस व्हॅनमध्ये जेवढे पोलीस होते त्या सर्वांचे हाताचे ठसे, हॅण्डवॉश मिळवा. दोन्ही पिस्तुलांवरील ठसे घेऊन फॉरेन्सिककडून अहवाल मिळवा, असे निर्देशही खंडपीठाने सीआयडीला दिले.