जळगाव (प्रतिनिधी) नगरविकास प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी कॉविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविड संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची तसेच केंद्र/राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना विमा कवच लाभ याविषयी ११ मुद्यांवर तपशीलवार माहिती मागितली आहे, आता जळगाव जिल्हा प्रशासन यावर काय उत्तर देते हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.
माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत जुलै २०२० मध्ये डॉ. नितु पाटील यांनी मार्च ते जवळपास सप्टेंबर २०२० या काळात जनमाहिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य रुग्णालय, जळगाव तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई याठिकाणी हीच मयत कोरोना योध्या यांची माहिती मागितली होती, पण त्यांना फक्त या काळात उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथील एकमेव कोरोना योध्या मयत झाल्याचे कळविले. विशेष म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांनी तर विस्तृत माहिती असल्याने माहिती देता येणार नाही असे ऑगस्ट २०२० मध्ये लेखी कळविले होते. पण डॉ. नितु पाटील यांनी या विषयावर पाठपुरावा सुरू ठेवला. नोव्हेंबर २०२० हीच माहिती आता नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सर्व महानगरपालिका आदी यांकडे मागितली आहे. आणि आता परत फेब्रुवारी २०२१ हीच माहिती नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद आणि नगर पंचायती यांना पण मागितली आहे.
कोरोना महामारीमध्ये ज्या-ज्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात कार्य केले प्रसंगी कोरोना संक्रमण होऊन मयत झाले तरी त्यांच्या बददल कुठलीही माहिती प्रसासनाकडे नाही. शिवाय ज्यांनी ज्यांनी कोरोना विमा कवचसाठी अर्ज दाखल केले त्याबद्दलपण माहिती कळत नाही. त्यामुळे वारसांना आणि परिवाराला मानसिक त्रास होत असून यात शासनाची अनास्था दिसून येते.
शहीद कोरोना योद्धा यांना विमा कवचाचे लाभासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करेल – डॉ. नितु
जळगाव जिल्हा मधील सर्व शहीद कोरोना योद्धा यांना विमा कवचाचे लाभ लवकरात लवकर मिळावे यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करेल, शिवाय त्यांच्या वारसांना अनुकंपनावर शासकीय नोकरी लागावी यासाठी देखील प्रयत्नशील राहील.” असे प्रतिपादन डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.