मुंबई (वृत्तसंस्था) बलात्काराचे आरोप झालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून रस्त्यावर उतरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाटील आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. अन्यथा तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागे असलेले काळे कारनामे बाहेर यायला वेळ लागणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपला विकासावर, शेतकरी आंदोलन, पेट्रोल डिझेल दरवाढ या मुद्यांवर बोलायला वेळ नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, आम्ही जर तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे पडद्यासमोर यायला वेळ लागणार नाही, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी भाजपला दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिल्याचं सांगितले. मात्र, भाजपला विकासावर, महागाईवर, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलण्यास वेळ नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्यास वेळ नाही. केंद्र सरकारविरोधात असलेला रोष वळण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर टीका टिप्पणी करत विषयाला वेगळं देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. आम्ही तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे समोर यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत चुकीच्या गोष्टींवरून आजपर्यंत कुणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी वेळोवेळी अशा घटनांच्या वेळी कठोर भूमिका स्वीकारलेली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र काल झालेल्या बैठकीत पवार यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांनी यावेळी रेणू शर्मा यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर झालेल्या आरोपाच्या चौकशी तुम्ही पोलीस सीआयडी, आणि चालत असेल तर सीबीआय कडून देखील करा. त्याबद्दल आम्हाला काही देणे घेणे नाही. मात्र, धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांच्यासोबत माझे गेल्या काही वर्षांपासून शारीरिक संबंध होते. तसेच त्यांच्यापासून मला दोन मुले आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना माझी नावे देखील दिली आहे, या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. परंतू, धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिल्यावर सुद्धा शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र याच मुद्द्यांवर आमचा आक्षेप असून मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा किंवा पवारांनी तो घ्यावा अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे आहे. भारतीय समाज हा नीतिमूल्ल्यांवर चालतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.