जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.
चित्ररथामध्ये सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती उपायोजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, मुला मुलींसाठी शासकीय वसतीगृह, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजना, अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत गाय गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देणे, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य ,मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा प्रतिकृती योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत.