जळगाव (प्रतिनिधी) शनिवारपासून पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात दुपारनंतर ढगांचा गडगडाट होऊ शकतो. दुपारनंतर अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या हजेरीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
४ मार्च ते ७ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचे ढग आकाशात गर्दी करण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यावर गेल्या २८ फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. चार दिवसांपासून जवळपास ३० टक्के आकाश ढगांनी व्यापले आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी किमान तापमान १६.२ अंश सेल्सिअसवर होते. शनिवारी त्यात किंचित वाढ होवू शकते. ढगाळ वातावरणाने कमाल तापमान ३३ ते २४ अंश सेल्सिअसवर स्थिर राहील. शनिवार आणि रविवारी उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. रविवारपासून मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो. दुपारच्या वेळेत तुरळक ठिकाणी वादळासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.