जळगाव (प्रतिनिधी) शहरातील समता नगरातील वंजारी टेकडी येथे जुन्या वादातून अरूण बळीराम सोनवणे (वय-२८) रा. समता नगर, तरूणाचा खून करून फरार झालेल्या तिसऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रविण उर्फ दोध्या पिंट्या प्रेमराज शिरसाळे (रा. नागदुली ता. एरंडोल ह.मु. संभाजी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील वावडदा येथून गुरूवारी अटक केली आहे.
अरुण सोनवणे या तरुणाचा रविवार, १० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता खून करून मारेकरी पसार झाले होते. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार पथकाने पहिला संशयित आरोपी सोनू पोपट आढळे याला ११ डिसेंबर रोजी विसरवाडी येथून तर दुसरा संशयित आरोपी अशोक राठोड याला १३ डिसेंबर रोजी नेपानगर येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती.
त्यानंतर दोध्या पिंट्या हा त्याच्या मूळ गावी नागदुली येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, विजय पाटील, किरण धनगर, सचिन महाजन, संदीप सावळे, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने गुरूवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता वावडदा येथे सापळा रचून दोध्या पिंट्याला देखील ताब्यात घेत रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. आता आरोपींची संख्या तीन झाली आहे. इतर फरार झालेल्या संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.