नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे (एमओएचयूए) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज आयोजिलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव-२०२१’ अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहरांना सर्वांत स्वच्छ असल्याबाबतचा वर्ष २०२१ करिता पुरस्कार प्रदान केला. यामध्ये कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला थ्री स्टार रेटिंग हा पुरस्कार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते जळगावच्या महापौर जयश्री सुनिल महाजन व महापालिका उपायुक्त पवन पाटील यांनी स्वीकारला.
यावेळी छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ.शिवकुमार डहरीया व स्वच्छ भारत अभियानाच्या संचालिका व सहसचिव श्रीमती रूपा मिश्रा यावेळी उपस्थित होत्या. समस्त जळगावकरांच्यावतीने आज महापौर व उपायुक्त यांनी तो स्वीकारला. या पुरस्काराच्या निवडीत देशात सर्वाधिक महाराष्ट्रातील ६९ शहरांचा समावेश आहे.
भारताला स्वच्छ बनविण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्ये आणि शहरांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी एकूण ४३२० शहरांचे पॅरामीटर मूल्यांकन करण्यात आले आहे. यापैकी २२३८ शहरे त्यात पात्र ठरली. या अहवालानुसार भारतातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत अनेक बदल झाले. तरीही इंदूरने सलग पाचव्यांदा भारतातील सर्वांत स्वच्छ म्हणून निवडले गेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरत (गुजरात) आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) यांना अनुक्रमे देशातील दुसर्या आणि तिसर्या स्वच्छ शहरांचा गौरव केला. वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये वाराणसीला सर्वांत स्वच्छ गंगा शहर श्रेणीत प्रथम स्थान दिले. तसेच छत्तीसगडला देशातील सर्वांत स्वच्छ राज्य म्हणून गौरविले. रायपूरने गतवर्षीच्या क्रमवारीत २१ व्या स्थानावरून यंदा सहावे स्थान पटकावले आहे.
‘प्रेरक दौर सन्मान’ पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये एकूण पाच अतिरिक्त उपश्रेणी आहेत. ज्यात दिव्य (प्लॅटिनम), अनुपम (गोल्ड), उज्ज्वल (रौप्य), उदित (कांस्य) आणि आरोही (आकांक्षी) आहेत. यात ओला, सुका आणि धोक्याच्या श्रेणींमध्ये कचर्याचे वर्गीकरण, शहरांच्या स्वच्छतेची स्थिती, लँडफिलमध्ये जाणार्या कचर्याची टक्केवारी आणि इतर घटकांच्या आधारे शहरांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आज स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ मध्ये १२९ स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, १२ सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार आणि कचरामुक्त शहरांसाठी १५२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षी 2238 शहरांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंग प्रोटोकॉलच्या मूल्यांकनात भाग घेतला. त्यात नऊ- 5 स्टार, 143- 3 स्टार आणि 147-1 स्टार रेट केलेल्या शहरांसह, शहरी भारत माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या कचरामुक्त शहरांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या मार्गावर आहेत.
थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार जळगावकरांसाठी भूषणावहच! : महापौर सौ. महाजन
याप्रसंगी महापौर जयश्री सुनिल महाजन म्हणाल्यात, “खरंतर शहरातील नागरिक विविध अडचणींचा सामना करताना मेटाकुटीस येतात. मात्र, सामंजस्य अन् सजगतेचा प्रत्यय आणून देत कचरा विलगीकरणाच्या प्रक्रियेत ते अग्रस्थानी राहिले. त्यासाठी ‘महापौर सेवा कक्षा’च्या माध्यमातून वारंवार केले जाणारे आवाहन व समन्वयही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळेच महाराष्ट्रातील ६९ शहरांमध्ये जळगावचा समावेश होऊन केंद्र सरकारचा कचरामुक्त शहरासाठीचा थ्री स्टार दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला, ही जळगावकरांसाठी भूषणावह बाब आहे. याबद्दल समस्त जळगावकर, महापालिकेच्या आरोग्य विभागासह या अभियानात सहभागी सर्व अधिकारी-कर्मचार्यांचे मी मनापासून कौतुक करते व आभारही मानते. हे सर्व शक्य झालं ते जळगावकरांमुळेच. भविष्यातही उत्तमोत्तम कामगिरी करून आपण यापुढील दर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न करू.”