जळगाव (प्रतिनिधी) गोल्ड कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा दोन टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवित निवृत्त सहायक फौजदार पुरुषोत्तम सुपडू लोहार (६३, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांची तीन लाख एक हजार रुपयाने फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीत पुरुषोत्तम लोहार हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. जानेवारी २०१९ मध्ये पोलीस मुख्यालयातील तत्कालीन ड्रील मास्टर देविदास वाघ हे त्यांना भेटले. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर सोन्याचा व्यापार करा असा सल्ला दिला. त्यासाठी तुम्ही त्यावेळेस पोलीस मुख्यालयात असलेल्या गणेश विरभान पाटील याला भेटा तो तुम्हाला सर्व सांगेल असे सांगितले. त्यानुसार दोघांची भेट देखील झाली. या भेटीत गणेश पाटील यांनी लोहार यांना सर्व प्लॅन समजावून सांगत, ती कंपनी मुंबई चिफ मॅनेजिंग डायरेक्टर कामता एच. सोनी फाऊंडर डायमंड ज्वेलरी एल.एल. पी हे असून जिल्ह्यातील फाऊंडर मेंबर हा रामानंद नगर हद्दीत राहणारा भैय्या पाटील यांच्यशी भेट घालून देत वेळोवेळी ३ लाख १ हजारांचे तीन धनादेश दिले होते.
पुरुषोत्तम लोहार यांनी गुंतवलेल्या ३ लाख रुपयांवर २ टक्के प्रमाणे पैसे मिळणे बंद झाल्यानंतर गुंतवलेले पैसे परत देण्याची भैय्या पाटीलकडे मागणी केली. परंतु त्याने तुम्हाला प्लॅन प्रमाणे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तयानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये लोहार यांना मुंबई येथे घेवून जात प्रमोद महाजन, निलेश कोळी यांना नेत कामता एस. सोनी यांची भेट घडवून आणली. त्यांनी भैय्या पाटील हा तुम्हाला लवकरच तुमच्या रकमेचा धनादेश देईल असे सांगितले.
दोन महिन्यांनानंतर भैय्या पाटील पुरुषोत्तम लोहार बँकेला ३ लाख ७५ हजारांचा धनादेश दिला. परंतू कामता एस. सोनी यांची आर्थिक तंगी असल्याने मी सांगेल तेव्हा तुम्ही धनादेश टाका, असे सांगितले. वेळोवेळी भैय्या पाटील यालो धनादेशबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दि. २१ जुलै २०२३ रोजी लोहार यांनी भैय्या पाटील याला गुंतविलेल्या रकमेबाबत विचारल्यानंतर त्याने जे मला फोन करुन सतावत आहे त्यांना मी महागात पडेल. तसेच मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी दिली. त्यानंतर शनिवारी पुरुषोत्तम लोहार यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार भैय्या पाटील व कामता एस. सोनी रा. मुंबई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.