जळगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्यात साखरपुडा झालेला. अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असल्याने घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण. परंतू ज्या घरातून मुलाच्या लग्नाची वरात निघणार होती. त्याच घरातून त्याची अंत्ययात्रा काढण्याचा हृदयद्रावक प्रसंग तालुक्यातील मोहाडी येथील मोरे परिवारावर ओढवला. रेल्वेखाली आल्यामुळे प्रवीण पितांबर मोरे-भिल ( वय घेतली. २०, रा. मोहाडी ता. जळगाव) या भावी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
प्रवीण मोरे हा मोहाडी गावामध्ये आई-वडील लहान भाऊ आणि बहिणीसह राहतो. प्रवीण आणि त्याचे वडील दोघे ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात. प्रवीण भिल याचा मे महिन्यात साखरपुडा झाला होता, जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे अवघ्या काही दिवसांनी प्रवीण याचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.
मंगळवारी रात्री प्रवीण मोहाडी गावाच्या पुढे सावखेडा शिवारातील रेल्वे पुलाजवळ गेला होता. तेथे खांब नंबर ४२९/१२, डाऊन लाईन जवळ रेल्वे खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. रेल्वे विभागाने बुधवारी मध्यरात्री दीड वाजता कळवल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीवरून त्याची ओळख पटली. प्रवीणच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी आणि गावातील नातेवाईकांनी आक्रोश केला.