जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी तत्कालीन एलसीबीचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा सत्र न्या.बी.एस.वावरे यांनी फेटाळून लावला आहे.
आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तत्काली पोलिस निरीक्षक किरण बकाले यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी ते पोलिसांना आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बकालेंनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ तसेच जळगाव जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, दोन्ही ठिकाणी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
संशयित किरणकुमार बकाले यांनी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एस. वावरे यांच्या न्यायासनापुढे सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद करताना अॅड.रमाकांत सोनवणे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. बकालेंना उच्च न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले असतांनाही त्यांनी याचे पालन न करत न्यायालयाचा अवमान केला आहे शिवाय त्यांना 41 अ ही नोटीस मिळाली नसतांनाही नोटीस मिळाल्याचे सांगून ते दिशाभूल करत असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. यासोबत, त्यांच्या आवाजाने नमूने घेणे बाकी असल्याचेही ते म्हणाले. यावर निर्णय देतांना न्यायमूर्तींनी किरण बकाले यांच्या अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळून लावत त्यांना तत्काळ तपास अधिकार्यांकडे उपस्थित होण्याचे निर्देश दिले.