जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेने शहरातील विविध गल्ली आणि मोहल्ल्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. याच संदर्भात तांबापूर वॉर्ड क्र. १४ येथील पटेल गल्लीच्या रहिवाशांनी आज महानगरपालिकेत जाऊन आपली हरकती व सूचना सादर केली. त्यांनी गल्लीचे नाव बदलून ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर’ ठेवण्याची मागणी केली आहे.
जळगाव महानगरपालिकेने शहरातील अनेक गल्ली आणि मोहल्ल्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर, पटेल गल्लीच्या रहिवाशांनी आपली हरकत सादर करत त्या गल्लीचे नाव ‘शिव पार्वती नगर’ ऐवजी ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर’ ठेवण्याची मागणी केली आहे. पटेल गल्लीमध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज रहात असल्याने, तेथील रहिवाशांनी भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने गल्लीचे नामकरण करण्याची विनंती केली आहे. रहिवाशांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, डॉ. कलाम यांनी देशासाठी केलेले अपार योगदान आणि त्यांच्या कार्यामुळे ते सगळ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत बनले आहेत. त्यांचे नाव मोहल्ल्याला सन्मान देईल आणि ते नवीन पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल.
तांबापूर, पटेल गल्लीचे रहिवासी म्हणाले, “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही, तर संपूर्ण भारताचे आदर्श आणि एकतेचे प्रतीक होते. त्यांच्या नावाने गल्लीचे नामकरण करणे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट असेल.” या निवेदनावर तांबापूर फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, वसीम बागवान, जावेद बागवान, शरफोद्दीन पटेल, रझाक पटेल, मकसूद भाई, शेख मूसा, वाहिद बागवान, आसिफ कुलकर्णी, मुश्ताक पटेल, शेख इरफान, सुफियान शेख, मुजम्मिल शेख, इब्राहिम शेख, शेख ताजुद्दीन आणि अनवर सय्यद यांच्यासह इतर अनेक रहिवाश्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
या निवेदनाचे स्वागत करत, महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले यांनी निवेदन स्वीकारले. रहिवाश्यांना आशा आहे की मनपा प्रशासन त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करेल आणि लवकरात लवकर निर्णय घेईल.