जळगाव (प्रतिनिधी) नदीपात्रात पोहत असताना अचानक फिट आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास धामणगावजवळील तापी नदीपात्रात घडली. रविंद्र आत्माराम कोळी (वय ३०, रा. जैनाबाद, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील जैनाबाद- कांचननगर परिसरातील रविंद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. सोमवारी (ता. (२९) रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. तर, त्याचे दोघे मित्र काही अंतरावर बसलेले होते.
पाण्यात पोहत असताना अचानक रविंद्रला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. या वेळी नदीपात्राच्या दुसऱ्या तिरावर असलेल्या ग्रामस्थांना तरुण बुड असल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड करायला सुरुवात केली. समोरच बसलेल्या मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेत त्याला बाहेर काढले. मित्रांनी पोटातून पाणी काढण्याचा आणि कृत्रीम श्वासोश्वास देण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रवींद्रला तपासून मृत घोषीत केले.