जळगाव (प्रतिनिधी) विवाहबाह्य असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय १५, रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार) याचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मयताच्या आईचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (वय ३८, रा. विखरण, ता. एरंडोल) याला न्यायालयाने दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील जलाराम नगरात मंगलाबाई पाटील ही महिला वास्तव्यास आहे. तीचे आणि प्रमोद शिंपी यांच्यातील अनैतिक संबंधाची कुणकुण मंगलाबाईचा मुलगा पुरुषोत्तम उर्फ प्रशांत याला लागल्याने त्याने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला, मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या मंगलाबाई व प्रमोद यांनी पुरुषोत्तमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या प्रेमात अडसर ठरु लागल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचला होता. त्यानुसार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी रावेर येथे कबुतर ठेवण्यासाठी पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात नेले. बऱ्हाणपूर तालुक्यातील आसीरगड येथील जंगलात नेऊन तेथे गळफास देऊन ठार मारले त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून दोघं जण माघारी परतले. दुसऱ्या दिवशी मुलगा सापडत नसल्याने वडील विलास नामदेव पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.
मुलगा हरविल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात होता. पोलिसांच्या तपासात धागेदोरे प्रमोद शिंपीपर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रमोद शिंपी याला पोलीसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद शिंपीसह मयताची आई मंगलाबाईला अटक केले होते. तेव्हापासून शिंपी हा कोठडीत होता तर मंगलाबाई जामीनावर होती.
हा खटला न्या. एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात चालला. खटल्यादरम्यान एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रमोद शिंपी याचा मित्र, तपासाधिकारी, जळगावचे कोतवाल, मोबाईल सीडीआरसाठी विषयी तांत्रिक माहिती देणारे व इतरांची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांनी काम पाहिले तर पोहेकॉ वासुदेव मराठे यांनी सहकार्य केले.