जळगाव (प्रतिनिधी) महावीर नगरात राहणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर वसुली अधिकारी सी.एस.इंगळे व त्यांच्या पत्नी ॲड. रेखा इंगळे यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी पाच जणांना शहर पोलिसांनी शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळून अटक केली आहे.
महावीर नगरात राहणारे धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर वसुली अधिकारी असलेले सी.एस. इंगळे हे पत्नी ॲड. रेखा इंगळे व मुलांसह त्यांच्या परिचयातील व्यक्तीकडे गेलेले असताना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या घरावर हल्ला करीत तोडफोड करण्यासह दोन लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना हल्लेखोर शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील पाटील, प्रदीप रणित, पोहेकॉ सतीश पाटील, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, योगेश पाटील, पोलिस नाईक चंदू पाटील हे शिवाजीनगरात पोहचले. तेथून सागर भिमराव सोनवणे (वय ३१, रा. वाल्मीक नगर), अमोल नागेश पाटील (वय २९, रा. हरिओम नगर), चेतन अनिल वाणी (वय २८, रा. शनिपेठ), अभिजित छोटू राजपूत (वय १९, रा. ममुराबाद नाका, गजानन नंदू पाटील (वय १९, रा. चौगुले प्लाट) यांना ताब्यात घेतले. सर्वांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.