जळगाव (प्रतिनिधी) कपाळावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने घाव घालून क्रुरपणे गळा चिरुन तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना तरुणाचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलीस पाटील यांनी नशिराबाद पोलिसांना घटना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता क्रुरपणे सौरभचा गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आलेले होते. दोन्ही हातांची त्वची बाहेर आलेली होती. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अलियार खान, हवालदार शिवदास चौधरी, रवींद्र तायडे, लिना लोखंडे व गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन दुपारी तीन वाजता मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, सौरभ याचा खून कोणी व कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतू अत्यंत क्रुरपणे गळा चिरुन खून केल्यामुळे अनेक जण हादरून गेले आहेत. तर दुसरीकडे एलीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील हे देखील नशिराबादला पोहचले असून त्यांनी आपल्या पथकाला तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.