जळगाव (प्रतिनिधी) मविप्रसह बीएचआर प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी दिल्ली सीबीआयचे पथक गेल्या तीन दिवसांपासून ठाण मांडून आहेत. त्यांच्याकडून या गुन्ह्याशी संबंधितांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपर्यंत सुरज झंवर यांचे तर दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत सुनिल झंवर यांचे जाब-जबाब नोंदविण्यात आले असून त्यांच्याकडून या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे देखील ताब्यात घेतले.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात झंवर परिवाराला मदत करण्यासाठी तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी चाळीसगावातील एका मद्य विक्रेत्याच्या माध्यमातून लाच स्विकारली होती.
याप्रकरणी तक्रारदार सूरज झंवर यांच्या तक्रारीवरुन चाळीसगाव पोलीस ठाण्यात अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह मद्य विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या शैक्षणिक संस्थेच्या वादप्रकरणी संस्थेचे सचिव नीलेश भोईटे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपासासाठी तीन दिवसांपासून सीबीआयचे पथक जळगावात ठाण मांडून बसले आहे.
गुन्ह्याशी संबंधित अनेक जण सीबीआयच्या रडारवर !
मविप्रसह बीएचआर संबंधित दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधितांचे सीबीआयच्या पथकाकडून जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये तक्रारदारासह संशयितांचे देखील जाबजबाब नोंदविले जाणार असून अनेक जण सीबीआयच्या रडावर आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरु होते जबाब नोंदविण्याचे काम !
पथकाने सलग दुसऱ्या दिवशी तक्रादार सुरज झंवर यांचे जाबजबाब नोंदविण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार सुरज झंवर हे सकाळीचे पथकासमोर हजर झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत सुनिल झंवर यांचे सीबीआयच्या पथकाने जाबजबाब नोंदविले. तसेच त्यांच्याकडून या गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर माहिती जाणून घेतली. तसेच सुनिल झंवर यांचा अपुर्ण असलेला जबाब शुक्रवारी नोंदविणार आहे.