जळगाव (प्रतिनिधी) कोरोना काळात शासकीय अधिकारी व इतरांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भोळे यांनी केला होता. या प्रकरणात न्या. विनय मुगलीकर यांच्यासमोर कामकाज झाले. कोर्टाने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
फिर्यादी दिनेश भोळे यांनी शासकीय अधिकारी व इतर अशा संशयित आठ जणांविरोधात जळगाव कोर्टात याचिका दाखल करून चौकशीची मागणी केली होती. कोरोना काळात व्हेटिलेटर व इतर वैद्यकीय साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा दावा भोळे यांनी केला आहे. या प्रकरणात न्या. विनय मुगलीकर यांच्यासमोर कामकाज झाले. कोर्टाने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी किंवा अन्य सक्षम अधिकाऱ्याने करायची आहे. चौकशीत गुन्हा घडल्याचे वा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यास सीआरपीसी कलम १९७ अन्वये पुढील कार्यवाही पोलिसांनी करावी आणि याबाबत वेळोवेळी कोर्टाला सूचित करावे, असे म्हटले आहे. अशी माहिती फिर्यादीच्या वकिलांनी दिली.