जळगाव (प्रतिनिधी) शहरात ब्युटीपार्लरचे साहित्य घेवून माघारी जाण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिन्यांसह ५० हजार ७०० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास टॉवर चौक परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा येथे संगिता रविंद्र राणे या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून त्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी त्या शनिवारी जळगावात आल्या होत्या. साहित्य खरेदीनंतर दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्या शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ बसची वाट पाहत उभ्या होत्या. काही वेळानंतर बस आल्यानंतर प्रवाशांची बसमध्ये चढतांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यावेळी चोरट्यांनी हातचालाखी करीत संगिता राणे यांच्या हातातील मोठ्या बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समधून ४५ हजार रुपये किमतीची सोनपोत, चार हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख १७०० रुपये असा एकूण ५० हजार ७०० रुपयांचा मद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.