जामनेर (प्रतिनिधी) पुनगाव ता.पाचोरा येथून आपल्या मित्रासोबत मोटर सायकलवरून बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारोती मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या एका ३३ वर्षीय मारोती भक्ताचा चारचाकी व दुचाकीत झालेल्या समोरासमोरील अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवार रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रामवनाजवळील डॉ. जगदीश महाजन यांच्या शेताजवळ घडली.
अर्जुन सुकलाल जाधव, विनोद राजू सुरवाडे व तुषार संतोष जामदार तिघे रा. पुनगाव ता.पाचोरा हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९ सी.सी ५२१२) वरून शनिवार असल्याने बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारोती मंदिरात दर्शनासाठी जात होते. तर पांढऱ्या रंगाची चारचाकी क्रमांक (एमएच २० ई.जे ९६९४) ही बोदवडकडून जामनेरकडे येत होती.
दोघ वाहन रामवनाजवळील डॉ. जगदीश महाजन यांच्या शेताजवळ समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव (वय ३३, रा. पुनगाव तालुका पाचोरा) हा जागीच ठार झाला. तर त्यांच्या दोघं मित्रांसह चारचाकीतील तीन असे पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. मयताचा भाऊ गोकुळ सुकलाल मोची यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये चारचाकी वाहनांच्या चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभार हे करीत आहेत.