जळगाव (प्रतिनिधी) भांड्यांसह सोने चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करुन देतो असे सांगून वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिने पॉलीश करण्याच्या नावाखाली हातचालाखी करीत वृध्देचे सव्वालाखांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी ईश्र्वर कॉलनीत घडली. दागिने घेवून दोघ भामटे पसार झाले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (वय ६५) ह्या दिराणी बायादेवी उदयराज वर्मा यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दोन्ही महिला घरी असतांना त्यांच्या घराजवळ दोन इसम आले. त्यांनी आम्ही कंपनीचे सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो असे सांगितले. त्यानंतर वृध्द महिलेने घरातील तांब्या दिला. तो त्यांनी साफ करून दिला. त्यानंतर दागिने देखील साफ करून देतो असे सांगितले. त्यानुसार वृध्द महिलेने सुरूवातील दोन चांदीचे कमरपट्टी दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले. त्यामुळे वृध्द महिलेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळी दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याच्या कानातील रिंगा काढून दिल्या.
परिसरात घेतला चोरट्यांचा शोध
डब्यातील पाण्यात ठेवलेले दागिने पुसण्यासाठी वृध्देने बाहेर काढत असतांना त्यांना डब्यात दागिने नसल्याचे दिसून आले. त्यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी त्या दोघ इसमांचा परिसरात शोध घेतला. मात्र ते कोठेही मिळून आले नाहीत. त्यानंतर बुधवारी वृद्धेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.
रंगीत पाण्यात दागिने ठेवून गॅसवर ठेवले
दागिने पॉलीशसाठी मिळताच दोघ भामट्यांनी एका डब्यात हळद व लालसर रंगाची पावडर टाकून त्यामध्ये दागिने ठेवले. त्यानंतर तो डबा काही वेळासाठी गॅस ठेवण्यास सांगितले. गॅसवर ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्यातील पाणी थंड झाल्यावर डब्यात ठेवलेले दागिने काढून ते कापडाने पुसून घ्या. असे सांगून भामट्यांनी वृध्देजवळ असलेले सोन्याचे दागिने हातचालाखीने लंपास करीत पसार झाले.