नाशिक (प्रतिनिधी) आरोग्य विभागात चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्त करण्याच्या बहाण्याने दोघांनी धुळे जिल्ह्यातील तब्बल ९० बेरोजगारांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी रोकड घेऊनही बेरोजगारांना नोकरीस न लावल्याने मध्यस्थी डॉक्टरने पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकारात भामट्यांनी बेरोजगारांची दीड कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता प्रशांत भदाणे (रा. ध्रुवनगर, सातपूर लिंकरोड) व वैभव विजय पोळ (रा. ब्राह्मण आळी, अलिबाग, जि. रायगड) अशी बेरोजगारांना ठकविणाऱ्या संशयित भामट्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. कुणाल गुलाबराव भदाणे (रा. शेवाळी, ता. साक्री जि. धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॉ. भदाणे व संशयित महिला एकमेकांचे नातेवाईक आहेत. अशोकस्तंभ परिसरातील भवानी माता मंदिर भागात शिवांजली सोल्युशन्स नावाचे कार्यालय थाटून भामट्यांनी बेरोजगार तरुणांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
संशयित महिलेने जुलै २०२३ मध्ये डॉ. भदाणे यांच्याशी संपर्क साधला. सरकारी ठेकेदार वैभव पोळ यांना नाशिक व धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी पुरविण्याचा ठेका मिळाल्याचे सांगत गरजू बेरोजगारांना कंत्राटी नोकरी मिळवून देण्याची ग्वाही दिली. सफाई कामगार, शिपाई, ड्रायव्हर, सुपरवायझर, लॅब टेक्निशियन, तसेच नर्सिंग आदी पदांसाठी भरती असल्याने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. भदाणे यांनी काही गरजूंना शिवांजली सोल्युशन या संस्थेच्या कार्यालयात पाठविले होते. या ठिकाणी संशयित महिलेने कंत्राटी पदावर सामावून घेण्यासाठी बेरोजगारांकडून प्रत्येकी हजारो रुपयांची रोकड गोळा केली. या रकमा थेट दोघांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
असे पडले पितळ उघडे
बेरोजगारांच्या जमवाजमवीत कुणाल भदाणे याने दोघांना मदत केली होती. त्यामुळे बराच काळ उलटूनही बेरोजगारांना नोकरी न लागल्याने त्यांनी कुणाल भदाणे याच्याकडे तगादा लावला असता, संशयित महिलेने डॉ. भदाणे यांना ५० हजार, तर काहींना दोन लाख रुपये परत देऊन बोळवण केली. त्यानंतर भदाणे यांनी अन्य नातेवाइकांच्या मध्यस्थीने दोघांची मीटिंग घडवून आणली असताना ठकबाजांचे पितळ उघडे पडले. बेरोजगारांना नोकरी न मिळाल्याने, तसेच पैशांच्या मोबदल्यात दिलेले धनादेश न वटल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला असून, वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.