ग्वाल्हेर (प्रतिनिधी) येथे दिनांक १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत युवा मुलींच्या एकेरी गटात जैन इरिगेशच्या समृद्धी घडीगावकरने अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या केशर निर्गुण हिचा २–० सेट ने पराभव करून आपल्या लागोपाठ दुसऱ्या राष्ट्रीय विजेतेपदास गवसणी घातली. तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने तमिळनाडूच्या बरकत निसा हिचा २–१ सेट ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या केशर निर्गुण हिने पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या व्ही. मित्रा हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
उपउपांत्य फेरीत समृद्धीने बिहारच्या शालू कुमारी हिचा २–० सेट ने पराभव करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता.
अंतिम सामना संपल्या नंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅरम महासंघाच्या सचिव सौ. भारती नारायण, व्ही. डी. नारायण, प्रभजितसिंग बचेर, मदन राज, गुरिंदर सिंग, काशीरामजी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
समृद्धी च्या ह्या यशस्वी कामगिरीवर तिचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, संचालक अतुल भाऊ जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, कॅरम व्यवस्थापक सैय्यद मोहसिन, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल व सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
















