जळगाव (प्रतिनिधी) चोरी, घरफोडी, दरोड्यासह असंख्य गुन्ह्यांमुळे एमपीडीएतंर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे सहा महिन्यांपासून कारागृहात राहून बाहेर येताच भावाच्या मदतीने पाचोऱ्यात – सराफ दुकान फोडून दागिने लुटणाऱ्या रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने बुलढाणा येथे एटीएम फोडून ते चोरुन नेण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भातील अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाल्याची माहिती पोलीस – अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोऱ्यातील सराफ गल्लीतील राहूल विश्वनाथ चव्हाण यांच्या मालकीच्या पाटील ज्वेलर्स हे दुकान दि. २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री फोडून दुकानातून ऐवज चोरीला गेला होता. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड झाली होती. पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असताना धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरीची घटना घडली. हे वाहन रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडून चोरटा पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा चोरटा रणजितसिंग जुन्नी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला धरणगाव पोलिसांनी अटक करुन वाहन देखील जप्त करण्यात आले होते.
एटीएम फोडून वाहनात नेल्याचा केला प्रयत्न
या गुन्ह्याच्या तपासात जुन्नी याने बुलडाणा येथे एटीएम फोडून ते चारचाकी वाहनात नेल्याची कबुली दिली. शिवाजी नगर, खामगावच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग निष्पन्न झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी जुन्नी याला संशयावरुन ताब्यात घेतले होते. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या जुन्नीने पाचोऱ्यातील सराफ दुकान फोडल्याची कबुली दिली.
गहाण ठेवले होते दागिने
सराईत गुन्हेगार रणजीतसिंग जुन्नी याने त्याच्यासोबत सख्खा भाऊ शक्तीसिंग जुन्नी, शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा. परभणी) हे दोघं असल्याचे सांगितले. यातील दागिने जळगावातील सराफाकडे गहाण ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या सराफाकडून दागिने हस्तगत केले आहेत.
कारागृहात झाली गुन्हेगारांशी ओळख
जुन्नी हा राज्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून राज्यातील अनेक कारागृहात त्याची गुन्हेगारांशी ओळख झाली आहे. तेथून बाहेर आल्यावर त्यांनी कुठे चोऱ्या व घरफोड्या करायच्या याचा प्लॅन तयार केला. पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार, उपनिरीक्षक सोपान गोरे, राहूल शिंपी, रणजित पाटील, योगेश पाटील, सागर पाटील व मजिदखान पठाण यांनी हा गुन्हा उघड केला. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.