मुंबई (वृत्तसंस्था) हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि संवाद लेखक, तसेच अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक सागर सरहदी यांचे आज निधन झाले आहे. सागर सरहदी यांना चित्रपट जगातील एक अतिशय कलात्मक लेखक मानले जायचे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सागर यांनी खाणे-पिणे पूर्णपणे सोडले होते. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘कभी कभी’, ‘चांदनी’ ‘सिलसिला’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. राहत्या घरी दिर्घ आजारपणामुळं त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ११ वाजता मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर सरहदी यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सागर यांचा जन्म १९३३ साली कराची येथे झाला होता. भारत पाकिस्तान फाळणीनंतर ते दिल्ली येथे राहण्यास आले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची प्रचंड आवड होती. अभिनय करणं त्यांना जमायचं नाही त्यामुळं त्यांनी मग लेखक होण्याचा निर्णय घेतला. अर्थात लिखाणात त्यांचा जम बसला परिणामी त्याकाळी अनेक प्रायोकिग नाटकांच्या पटकथा ते लिहू लागले. त्यांची जबरदस्त लिखाणाची शैली पाहून यश चोप्रा यांनी त्यांना कभी कभी या चित्रपटाची पटकथा लिहण्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पुर्ण केली. अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला.
जॅकी श्रॉफने व्यक्त केला शोक !
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफने सागर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर सागर सरहदीचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले- मला तुमची आठवण येईल.