जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी आणि जागरूक नागरिकांनी घ्यावी. असा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिल्या.
जिल्हा नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विदया गायकवाड, गणपती मंडळांचे अध्यक्ष सचिन नाराळे, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.
श्री.प्रसाद म्हणाले, गणेश मंडळास येणाऱ्या अडचणी व विविध प्रकारच्या परवानगी तसेच उत्सव काळात प्राप्त झालेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, यांची नोडल अधिकारी (समन्वय) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक खिडकी योजनेद्वारे एकाच ठिकाणी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येणार आहे. उत्सव परिसर व मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील खड्डे विहीत पध्दतीने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात यावेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे व सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची दक्षता घेण्यात यावी.
मंडपाची तपासणी करण्यात यावी. महसूल, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिकेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेऊन कामकाज करावे. गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन घाट तसेच कृत्रीम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र स्वच्छ वाहनाची व्यवस्था करणे व मुर्ती संकलनासाठी वापण्यात येणारी वाहने स्वच्छ व सुव्यवस्थित असतील याची दक्षता महानगरपालिका व नगरपरिषद यांनी घ्यावी. गणेशोत्सव काळात महावितरणने यंत्रणेने विद्युत पुरवठा सुरळीत राहील. याची दक्षता घ्यावी. असा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
०००००००००