जळगाव (प्रतिनिधी) भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्यासमोर ईडीने आणखी एक अडचण उभी केली आहे. ईडीने ‘एलओसी’ (लूक आऊट सर्क्युलर) बजावल्याने एकनाथराव खडसे, मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी या तिघांना देशाबाहेर जाता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ईडीने गुरुवारी खडसेंना एलओसी बजावली आहे. त्यानुसार देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आणि इतर इमिग्रेशन तपासणी नाक्यावरच्या यंत्रणांना त्याची माहिती कळविली जात आहे. त्यामुळे तिघांना विदेशवारी करता येणार नाही.
मंदाकिनी यांना दिलासा
पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. मंदाकिनी यांना खडसे अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने मंदाकिनी खडसेंना दिला आहे. विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने मंदाकिनी यांना दिले आहेत. याबाबतचे वृत्त आज लोकमतने दिले आहे.
एलओसी म्हणजे काय ?
लूक आऊट सर्क्युलर अर्थात एलओसी नोटीस फरार आरोपीच्या अटकेसाठी तसेच एखादा आरोपी किंवा संशयित देशाबाहेर पळून जाऊ नये, म्हणून काढली जाते. देशाबाहेर पडण्याच्या सर्वच मार्गावरील संबंधित इमिग्रेशन अधिकाऱ्याला स्थलांतर अधिकारी त्यासंदर्भात कळविले जाते.