जळगाव (प्रतिनिधी) मला जो कोरोना होतो तो ‘ईडी’ च्या तारखा पाहून होत नाही. खडसे यांना ‘ईडी’च्या तारखा पाहूनच कोरोना होतो. माझे तसे नाही. मला एकदाच कोरोना झाला अशा शब्दांत भाजप नेते, आमदार गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. आज कोरोनामुक्त झाल्यानंतर जळगावात आलेल्या महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की त्यांना कोरोना होतो, असा सणसणीत टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे त्यांनी उपचार घेतले. त्यातून ते बरे झाले. आज जळगाव येथे त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जळगावसह राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सरकारचे डोके ठिकाणावर नाही. मंत्र्यांचा कोणाचा कोणाला पायपोस नाही. सरकारने आता तरी तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.
खडसे यांनी महाजन यांना झालेल्या कोरोना बाबत आक्षेप घेतला होता. महाजन यांना कोरोना कसा झाला, असेही त्यांनी विचारले होत. त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले की, माझा कोरोना काही खडसे यांच्या सारखा नाही. ‘ईडी’ची तारीख आली की खडसे यांना कोरोना होतो. ते खासगी दवाखान्यात दाखल होतात. खोटे प्रमाणपत्र तयार करून ते मुंबईत फिरत असतात. माझे मात्र तसे नाही मला कोरोनाची लागण झाल्यानंतर मी मुंबईत सेंट जॉर्ज या शासकीय हॉस्पिटलमध्ये दहा दिवस उपचार घेतले. माझ्या बायकोला, मुलीला कोरोना झाला त्यांनी सर्वांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले.
सुरुवातीला एकनाथराव खडसे यांना तीन-तीन वेळा कोरोना कसा होतो? याचे संशोधन झाले पाहिजे असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना डिवचले होते. त्यानतंर महाजन यांना कोरोना झाल्यानतंर एकनाथ खडसे यांनी टोला हाणला होता. ‘गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला कोरोना खरा आहे का? की, जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे, असं खडसे म्हणाले होते. खडसेंच्या या वक्तव्याचा महाजन यांनी आज समाचार घेतला.