मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे (ncp) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यात गेल्या काही वर्षात दोघांमध्ये कमालीचं वितुष्ट आलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन नेते सोडत नाहीत. पण आज मात्र, हे दोन्ही नेते अचानक भेटले. त्यावेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. खडसेंनी तर महाजन यांच्या खांद्यावर हात ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. तर भाजपने उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. खापरे या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात आल्या होत्या. त्यांच्यासोबत गिरीश महाजनही होते. महाजन हे खालच्या फ्लोअर उभे होते. तितक्यात समोरून खडसे यांचा ताफा आला. यावेळी खडसे यांचे समर्थक नाथाभाऊ खडसे आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत होते. खडसेंसोबत असंख्या कार्यकर्ते होते. त्यांची कन्या रोहिणी खडसेही सोबत होत्या. खडसे येत असल्याचं पाहून महाजन बाजूला झाले आणि त्यांनी खडसेंना वाट मोकळी करून दिली. महाजन तिथे आहेत हे खडसेंना माहीत नव्हतं. ते पुढे निघून गेले.
अन् महाजन हात जोडतच आले
थोडं पुढे गेल्यावर खडसे थोडे थांबले. खडसे गर्दीत होते. तिथेच रोहिणी खडसे यांनी महाजनही समोर असल्याचं सांगितलं. तेवढ्यात महाजनही वळले. महाजन वळताच खडसे आणि महाजन यांची नजरानजर झाली. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. त्यानंतर महाजन पुढे चालत गेले. महाजनांनी दोन हात जोडले. तर खडसेंनीही नमस्कार करत हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. दोघांनी हातात हात मिळवला.
नंतर खडसेंनी महाजनांच्या खांद्यावर हात ठेवला. खडसे प्रचंड आनंदी होते. महाजन यांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर खडसे यांनी डोळ्याला हात लावला. ते भारावून गेल्यासारखे दिसत होते. दोघेही एकमेकांशी दोन मिनिटं बोलले. यावेळी महाजनांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे स्मितहास्य होतं. तर खडसेही प्रचंड रिलॅक्स झाल्यासारखे दिसत होते. मात्र, महाजन आणि खडसेंनी एकमेकांच्या हातात हात मिळवलेला पाहून अनेकांच्या भुवया चढवल्या. राजकारणातील दोन कट्टर वैरी इतक्या आत्मियतेने भेटल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. तर काही कार्यकर्ते सुखावले होते.