जळगाव (प्रतीनिधी) जिल्हा बँक निवडणुकीच्या दरम्यान आता संजय पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरवाजे बंद झाले असल्याचे एकनाथराव खडसे यांनी म्हटले होते. परंतू जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी विराजमान झाल्यानंतर संजय पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची भेट घेतल्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बंडखोरी करून भाजप- शिंदे गटाच्या मदतीने जिल्हा बँकेत चेअरमनपद मिळविलेले संजय पवार यांनी अजितदादा पवारांची मुंबईत भेट घेतली. यासोबतच त्यांनी सहकार मंत्री अतुल सावे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतली. संजय पवार यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणासह राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर काहींनी चांदसरच्या पवारांचे बारामतीसोबतचे नाते अतूट असल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.
जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही संजय पवारांच्या मदतीने भाजप- शिंदे गटाने राष्ट्रवादी व एकनाथराव खडसे यांना धक्का देऊन जिल्हा बँक ताब्यात घेतली होती.
दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी संजय पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाल्याचे म्हटल्यानंतरही संजय पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, दुसरीकडे मंगेश चव्हाण यांच्या मदतीने त्यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांचीही भेट घेतली. सावे व गिरीश महाजन यांच्याशी जिल्हा बँकेतील प्रश्नांवर आपली चर्चा झाली, दोघांनी शासन पातळीवरचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले तर अजित पवार यांनीही बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व दूध संघाचे संचालक रोहित निकम उपस्थित होते.