मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. केवळ जळगावचे दोन आमदारच माझे समर्थक आहे असे नाही. भाजपमध्ये (BJP) माझे अनेक समर्थक आहेत. ते आजही माझ्यावर प्रेम करतात. मात्र, ते पक्ष सोडून मला मतदान करतील असे वाटत नाही, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसून त्यांचा एक उमेदवार पडल्याने आता आघाडीतील दोन्ही काँग्रेसने पाठिंब्यासाठी अपक्षांच्या भेटी घेतल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 14 जून रोजी सर्वात आधी काँग्रेसचे भाई जगताप यांनी ठाकूर यांची भेट घेऊन बविआची 3 मत देण्याची विनंती त्यांनी केली होती.
त्यानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर विधानपरिषद सभापती तथा राष्ट्रवादी उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी ठाकुरांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ठाकुरांची भेट घेतल्याने त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार हे मात्र, अजूनही गुलदस्त्यात राहिले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतांजी जुळवाजुळव सुरू झाली आहे. यामुळेच मी हिंतेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांना मी शब्द मागायला आलो नव्हतो तर मत मागण्यासाठी आलो होतो. मत करण्याचा निर्णय शेवटी त्यांचा आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. भाजपमधील अनेकांना तिकीट मिळवून देण्यासाठी मदत केली. मंत्रिमंडळात स्थान देण्यासीठीही मदत केली. यामुळे अनेकजण माझ्यावर प्रेम करतात. मात्र, पक्ष सोडून ते मला मतदान करतील असे वाटत नाही. कारण, प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी असते. अनेकजण माझ्या संपर्कात आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
भाजप मला पाडण्याचा प्रयत्न करेल हे स्वाभाविकच
आपल्याविरोधकांच्या विरोधात मतदान झाले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. भाजपचा उमेदवार निवडूण येऊ नये अशी आमची भूमिका आहे. यामुळे मला पाडण्याचा भाजप प्रयत्न करेल याचा प्रश्नच येत नाही. हे सर्वांसाठी सारखेच आहे. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, अशी आशा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
उद्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना एका मताची धाकधूक
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकएकेका मताची जोडणी करताना सर्व्याच पक्षाच्या नाकीनऊ आले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन मतापैकी एका मताची धाकधूक काँग्रेस आणि भाजपला लागून राहिली आहे. बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर हे कौटुंबिक कामासाठी न्यूयार्कला गेल्याने ते उदयच्या मतदानासाठी येणार का? हा प्रश्न याठिकाणी चर्चेत आहे. क्षितिज ठाकूर उद्या येणार कि नाही हेच प्रश्न राजकीय पक्ष एकमेकांना विचारत आहेत. जर ठाकूर मतदानाला आले नाही तर त्याचा फटका कोणाला बसणार आणि आले तर कोणाला मत देणार. हा याठिकाणचा चर्चेचा विषय झाला आहे.