बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर आज सकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अस्थी संचयनाचा विधी पार पडला. या विधीस शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थित राहून अस्थींचे दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
खडसे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि जय पवार यांचे सांत्वन करत कुटुंबीयांना धीर दिला. कार्यक्रमास सदानंद सुळे व आ. रोहित आर. पाटील यांचीही उपस्थिती होती.
यावेळी खडसे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील बोदवड पंचायत समितीचे माजी सभापती गणेश पाटील, मार्केट कमिटी संचालक ज्ञानेश्वर पाटील, शिरसाळा सरपंच प्रवीण पाटील, मानमोडीचे सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, डॉ. अभिषेक ठाकूर, गजानन पाटील, सुरवाडा येथील निलेश गावंडे, दिलीप पौड, पवन विलास देवकर, दीपक काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, विद्या प्रतिष्ठान येथील कार्यक्रमानंतर आ. खडसे यांनी संबंधित अपघातस्थळी भेट देत बारामती विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या दुर्घटनास्थळाची पाहणी केली. उपस्थित अधिकारी व प्रत्यक्षदर्शींकडून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळी विखुरलेल्या कागदपत्रे व फाईल्स पाहून खडसे भावूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.












