जळगाव (प्रतिनिधी) सुर्या फाऊंडेशनतर्फे खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला “खान्देश करिअर महोत्सव” महत्वपूर्ण ठरला. दि. १०, ११ व १२ एप्रिल दरम्यान जळगाव शहरात शिवतीर्थ मैदान येथे हजारो तरुण-तरुणींनी भेट देऊन विविध संस्थांची माहिती जाणून घेतली. महोत्सवाचा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार वितरण आणि व्याख्यानांद्वारे यशस्वी समारोप झाला.
तीन दिवसात १२०० पेक्षा अधिक तरुणांनी दिली भेट
विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर यांनी तरुण व तरुणींना मार्गदर्शन केले. महोत्त्सवाला ३ दिवसात जवळपास १२०० पेक्षा अधिक तरुणांनी भेट देऊन विविध संस्थांची व रोजगाराविषयी माहिती जाणून घेतली.
संरक्षण क्षेत्राविषयी लेफ्टनंट योगेश बोरसे यांचे मार्गदर्शन
जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील लेफ्टनंट प्रा. डॉ. योगेश बोरसे यांनी ‘संरक्षण व करिअर’ या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. संरक्षण दलात असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण टिप्स उपस्थित तरुणाईला सांगितल्या.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली मने
खानदेश करिअर महोत्सवाचा संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोप झाला. यावेळी विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक असे नृत्य सादर करून रसिकांचे मने जिंकली. यावेळी विविध शैक्षणिक संस्थाना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन मंजुषा अडावदकर यांनी केले. आभार सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी मानले.