जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. परंतू ६ दिवस ओलांडल्या नंतरही मुलीचा शोध लागत नसल्यामुळे हताश पिडीत पित्याने थेट पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेत एक तक्रारी अर्ज दिला. या तक्रारी अर्जात त्यांनी आपल्या मुलीला पळवून नेणारा मुलगा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा चुलत साला व एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच आणखी एका बड्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्यामुळे मुलीचा तपास लागत नाही. तसेच मुद्दाम प्रकरण दडपले जात असून जामनेर पोलिसांच्या तपासावर विश्वास राहिलेला नाही, असा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान, श्री. महाजन यांचे पीआरओ अरविंद देशमुख यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय म्हटलेय फिर्यादीत
यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते आपली पत्नी मुलगा व दोन मुलींसह गावात राहतात. त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे. गावातील स्वप्नील मधुकर पाटील यास ते चांगल्याप्रकारे ओळखतात. सहा महिन्यापूर्वी त्यांना मुलीने सांगितले होते की, स्वप्निल हा माझ्यामागे शाळेमध्ये मोटरसायकल घेऊन फिरत होता. त्यावेळी मी स्वप्निलच्या आईवडिलांना समक्ष घरी जाऊन समज दिली होती. परंतू गावातील संबंध असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. परंतु २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मी घरी होतो. तर माझी पत्नी शेतात गेली होती. त्यावेळी लहान मुलगी व तिच्यासोबत लहान भावाची मुलगी हे दोन्ही किराणा दुकानवर जातात असे सांगून घरातून निघाले. परंतु भावाची मुलगी घरी आली आणि माझी मुलगी आली नाही. यावर आपण भावाच्या मुलीला विचारले असता तिने सांगितले की, माझी मुलगी स्वप्नील पाटीलसोबत मोटरसायकलवर हिवरखेडा रोडकडे गेली आहे. त्यानंतर आम्ही मुलीचा शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. तसेच स्वप्निल हा सुद्धा घरी नव्हता. त्यामुळे स्वप्नीलने काहीतरी आमिष दाखवून आपल्या मुलीला पळवून घेऊन गेल्याचे म्हटले होते. या प्रकरणी २१ तारखेला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी भादवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु या प्रकरणात सहा दिवस उलटले तरी पोलिसांकडून कुठलाही तपास झाला नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेत पुन्हा एक तक्रारी अर्ज दिला.
काय म्हटलेय पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी अर्जात
या तक्रारी अर्जात पिडीत पित्याने म्हटले आहे की, मूलीला फूस लावून पळवून नेणारा स्वप्निल पाटील हा राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा चुलत साला आहे. तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी देविदास पाटील व सेवानिवृत्त माहिती अधिकारी वसंत पाटील यांचादेखील नातेवाईक असल्यामुळे पोलीस तपासात दिरंगाई करत आहे. स्वप्निलचे पोलिस व राजकीय क्षेत्रात नातेवाईक असल्यामुळे सदर प्रकरण दडपण्यात येत आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. तसेच जामनेर पोलिसांच्या तपासावर माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुलीस पळवून येणारा आणि या सर्व प्रकरणात मदत करणाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हावी व माझ्या मुलीला परत मिळवून द्यावे, अशी विनंती केली आहे. या प्रकरणात पिडीत मुलीच्या वडिलांनी मुलीला पळवून नेण्यात मदत करणाऱ्यामध्ये गावातील काही लोकांची नावे घेतली आहेत. तर ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, माझी मुलगी लहान आहे. आम्ही गरीब लोकं असल्यामुळे आमची कुणीही दखल घेत नाही. कुण्या मोठ्या माणसाबरोबर असं घडले असते तर पोलिसांनी तात्काळ आरोपीला उचलून आणले असते.
दरम्यान, या संदर्भात गिरीश महाजन यांच्यासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही. श्री. महाजन हे चाळीसगाव तालुक्यात कार्यक्रमात व्यस्त असल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी भाऊंचा दुरान्वये संबंध नाही. पोलिसांनी नि:पक्षने तपास करावा. कोणी काहींही आरोप लावेल त्यात काही तथ्य नाही. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना गिरीश महाजन यांचे पीआरओ अरविंद देशमुख यांनी देत सर्व आरोप फेटाळून लावले आहे.