नाशिक (वृत्तसंस्था) दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने राग मनात धरून तिसऱ्या दिवशी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केली. यानंतर त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी (दि.२६) उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. राजा गब्बर सिंग (१६ रा. स्वामीनगर, अंबड) असे मृत मुलाचे नाव आहे.
शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मयत राजा सिंग याची संशयितांसोबत दत्तनगर येथे हाणामारी झाली होती. या भांडणाचा राग मनात ठेवत चार ते पाच जणांच्या टोळक्याने शनिवारी (दि. २५) शनिवारी सायंकाळी अंबडगाव येथून राजा सिंग याचे अपहरण करून त्याला विल्होळी येथील एका खडी क्रशर जवळ नेत बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी त्याला राजूर बहुला परिसरातील एका निर्जनस्थळी फेकून दिले. या कालावधीत राजा सिंग घरी न आल्याने त्याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना वाडीव-हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी सिंग याच्या मारेकऱ्यांच्या शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पोलीस नाईक जनार्दन ढाकणे यांनी तपासाची चक्रे फिरवत राजा सिंग याचा खून करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी काही संशयित फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सिंग हा अंबड येथील शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका कंपनीत रोजंदारीने मजूर म्हणून काम करतात. राजा हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश केला होता.
राजा सिंग हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचे वडील गब्बर परशुराम सिंग (वय ४२, रा. स्वामीनगर, अंबड) यांनी रविवारी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांकडून राजा सिंग याचा शोध सुरू असताना वाडीव-हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली असताना हा मृतदेह अपहरण झालेल्या सिंग याचाच असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक निरीक्षक वसंत खतेले हे करीत आहेत.